fbpx

मंडळी रामकृष्ण हरी, वासुदेव हरी हे दोन शब्द बोलल्याशिवाय तुम्हांला पांडुरंगाचे भक्त असल्यासारखं वाटतच नाही. कारण ह्या दोन शब्दात एक वेगळीच ताकद आहे, तर तुम्हांला सर्वाना माहितेय की ह्यावर्षीची आषाढी ची वारी होणार नाही आहे. त्याचं कारण म्हणजे जगावर आलेलं ‘कोरोना’ नावाच्या महामारीचं, ह्या आजारामुळे ३ महिन्यानपुर्वीच महाराष्ट्रातील सर्व देवस्थाने बंद ठेवण्यात आली आहेत. आणि त्यात पंढरपुरातील विठ्ठल रखुमाईचं मंदिर देखील इतिहासात पहिल्यांदाच बंद ठेवण्यात आलं आहे. याच कारणामुळे या वर्षीची वारी काही होणार नाही आहे.

मंडळी विठुरायाचे भक्त त्याच्या भक्तीमध्ये इतके स्वतःला हरवून घेतात की त्यांना तहान-भूक ह्याचं भानचं नसत, ह्या भक्तिभावाचे अनेक उदाहरण आपल्याला माहित असतील. त्यातील संत गोरा कुंभार यांचा प्रसंग आठवला की अंगावर शहारे आल्याशिवाय रहात नाही, त्या पांडुरंगाच्या नामस्मरणात इतके तल्लीन झाले होते संत गोरा कुंभार की त्यांना ह्याचं भान नव्हत की आपण जो चिकल तुडवतोय त्यात आपण आपल्या बळालादेखील तुडवतोय आणि आपल्याला त्याची जराही कल्पना नाही आहे. मंडळी जसे भक्त विठूरायासाठी वेडे आहेत तसा तोही आपल्या भक्तांसाठी वेडा आहे. “कानडा राजा पंढरीचा” ह्या ग.दि.माडगुळकर यांनी लिहिलेल्या अभंगात एक ओळ आहे आणि ती अशी ‘ हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो’ ह्या ओळीचा अर्थ असा की, तो परमात्मा हा त्या संतरुपी भक्तांच्या सहवासासाठी काहीही करायचा. संत तुकाराम देखील नामस्मरणात इतके गुंग होऊन जायचे की त्याचं सुद्धा संसारात कधी मन रमलचं नाही, तेही दिवसरात्र त्या पांडुरंगाच्या भक्तीत लीन होऊन जायचे. आणि कीर्तनातुन समाजप्रबोधन करायचे.      

       मंडळी आता आपण या वारीचा थोडासा इतिहास जाणून घेऊयात, वारीचा इतिहास हा तेराव्या शतकापासून आहे, संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज या भावंडाना भेटून वारीची परंपरा सुरु केली. जगद्गुरु संत तुकाराम महाराजही वारी करत होते. पुढे त्यांची ही परंपरा तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराजांनी सुरु ठेवली. त्याकाळी म्हणजे १६८० ते १८३० च्या दरम्यान वारी देहू आणि आळंदीहून एकत्रित जात होती. मंडळी पावणेदोनशे वर्षांपूर्वी लष्करी अनुभव असलेल्या सरदार हैबत बाबांनी शाही रूप लावताना दिंडीला शिस्त लावली, त्यांच्यामुळे दिंडीत हत्ती, घोडे आणि त्याचसोबत आचार संहिता तयार झाली होती. शिवाय हैबत बाबांनी दिंडीत म्हणावयाच्या अभंगाची यादी देखील बनवली होती. तर आता या वारीब्ब्द्ल जाणून घेतल्यानंतर आपण जाणून घेऊयात वारीतल्या वारकरयाबद्दल, मंडळी वारकरी म्हणजे नक्की कोण? तर याचा सरळ अर्थ असा आहे की, “समाजामध्ये असणाऱ्या रूढी परंपरा, अंधश्रद्धा यांच्या वरती वार करण्याची वृत्ती ज्याच्या अंतकरणामध्ये तयार होते, त्याला वारकरी असे म्हणतात”. आणि साध्या भाषेत सांगायचं झालं तर ‘आपल्या परंपरेचा वारसा जे चालवतात त्यांना वारकरी म्हणतात’, आता आपण जाणून घेऊया की ही वारकरी परंपरा का सुरु झाली, तर संताना देवाने आज्ञा दिली होती की, तुम्ही आषाढी कार्तिकीला मला भेटायला येत जा, आणि म्हणून त्या परंपरेला संतानी वारसा दिला आणि ही वारकरी ची परंपरा सुरु झाली.

      मंडळी आपल्या पांडुरंगाचे अनेक भक्त संतरुपी होऊन गेले आणि आपल्या प्रत्येक भक्ताची ओळख म्हणून पांडूरंगाने आपल्याला दिलीच आहे.

“ युगे अठठावीस विटेवरी उभा| वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा,

पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा| चरणी वाहे भीमा उद्धरी जगा”

ह्या दोन ओळी आपल्याला विठ्ठलाच्या आरतीतल्या माहित आहेत. तर विठ्ठल युगे अठठावीस विटेवर उभा का राहिला ह्याब्ब्द्ल थोडं जाणून घेऊया, भगवान परमात्मा ज्यावेळेला द्वारकेत राहायचे, त्यावेळेस त्याठिकाणी सर्व राधाकृष्ण नामाचा जयघोष करत असे, त्यावेळेस रुक्मिणीला राग आला आणि रुक्मिणीने विचार केला सर्वजण राधाकृष्ण नामाचा जप करतात ह्याचा त्यांना राग आला आणि त्या पंढरपुरातून दिंडे रवनामध्ये आल्या आणि त्यांना समजवण्याकरीता विठ्ठल भगवान तिथे आले की आजपासून माझ्यासोबत तुझ नावं घेतलं जाईल, म्हणूण आपण वारीमध्ये “विठ्ठल रखुमाई” नामाचा घोष करतो. ज्यावेळेस रखुमाईला समजविण्याकरीता भगवान आले. त्यावेळेस ते पुंडलिकाकडे गेले आणि पुंडलिक आई-वडिलांची सेवा करत होता. त्यामुळे त्याने पांडुरंगाला पुंडलिक म्हंटला देवा मी माझ्या आई-वडिलांची सेवा करतोय. त्यामुळे मी तुझ्याकडे वीट फेकतो तु त्या विटेवर उभा राहा, आणि जसा विठूराया विटेवर उभा राहिला तशी वारकऱ्यांची पंढरपुरच्या वारीची परंपरा सुरु झाली.

     मंडळी वारी म्हणजे चैतन्याचा महामेळा, वारी म्हणजे विठुरायाच्या दर्शनाची ओढ, वारी म्हणजे अमाप उत्साह, वारी म्हणजे निस्वार्थ भक्तीभाव, वारी म्हणजे ओसंडून वाहणारा श्रद्धेचा झरा, वारी म्हणजे विठूरायाला डोळ्यात साठवून घेणे, मंडळी वारी म्हणजे एक नेत्रसुखद अनुभव. एक प्रकारे पंढरीची वारी ही वारकऱ्यांच्या आयुष्यातली आनंदपर्वणीच, विठोबाचं राज्य हे त्यांच्यासाठी नित्य दिवाळीच असते. आज महाराष्ट्रातला प्रत्येक वारकरी हा १८ दिवस ह्या वारीचा पायी प्रवास करतो. त्यात लहान थोरांपासून ते वयोवृद्ध देखील असतात. ह्या १८ दिवसाच्या प्रवसात त्यांना फक्त आणि फक्त त्या विठूरायला भेटण्याची ओढ असते. अहो कित्येकांना तर त्या पांडुरंगाच मुखदर्शन पण होत नाही. ते लोक मंदिराच्या कळसाला नमस्कार करू परतीच्या प्रवासला निघतात. ह्या पंढरीच्या वारीत प्रत्येक कोणी आपल्या तक्रारी, इच्छा, आकांक्षा घेऊन प्रवास करत असतो, तर कोणी फक्त निस्वार्थ भावनेने वारी करत असतो. ह्या वारीत प्रत्येकजण लहान असो किंवा मोठा असो एकमेकांना “माऊली” ह्या नावाने आवाज देणार, सतत देवाचं नामस्मरण आणि चांगले विचार ह्या वारीतून घडत असतात.

    मंडळी ह्यावर्षी इतिहासात पहिल्यांदा ह्या परंपरेला खंड पडला आहे, पण जरी ह्या परंपरेला खंड पडला असला तरी वारकऱ्यांची त्या पांडुरंगा प्रती श्रद्धा ही अखंडित आणि अविरत सुरु आहे. ह्यावर्षी जरी वारकरी लोकांना प्रत्यक्षात जाऊन दर्शन नाही मिळणार पण त्यांना त्यांच्या भक्तीतून त्या पांडुरंगाने त्यांना ते आहेत त्या ठिकाणी दर्शन दिले आहे. मित्रहो वारी आणि वारकरी हे दोन अश्या गोष्टी आहेत त्यावर लिहावे तितकं कमी आहे. हे दोन्ही न संपणारे विषय आहेत. तूर्तास तरी इथेच थांबतो ‘रामकृष्ण हरी, वासुदेव हरी”

                       |पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम|

                                     पंढरीनाथ महाराज की जय,     

                                                    लेखक:- प्रसाद सुधीर सावर्डेकर